बल्लारपूर प्रभाग क्र. १० मध्ये पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय; दोन ठिकाणी बोअरवेल कामाला प्रारंभ, नागरिकांना मोठा दिलासा .!
बल्लारपूर (का.प्र.) : प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण करत स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पाणीटंचाईच्या समस्येवर ठोस पाऊल उचलले आहे. प्रभागातील धनलक्ष्मी किराणा स्टोअर परिसर तसेच भेंडे यांच्या घरामागील वनक्षेत्रालगतच्या भागात अशा दोन ठिकाणी बोअरवेल (बोरिंग) खोदण्याच्या कामास आज विधिवत प्रारंभ करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून प्रभागातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत असल्याने नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. ही बाब लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर तातडीने उपाययोजना राबविण्यात आली. पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी व भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी बोअरवेल हा दीर्घकालीन पर्याय निवडण्यात आला आहे.
या उपक्रमामुळे प्रभागातील पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही उपाययोजना अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
या कामाच्या प्रारंभी शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा ख्यातनाम वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अनिल वाढई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष राकेश सोमानी, नगरसेवक सुमित (गोलू) डोहणे, नगरसेविका प्रतिनिधी शाहिद शेख तसेच प्रभागातील अनेक नागरिक उपस्थित होते.
बोअरवेलच्या कामास सुरुवात होताच परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी या जनहिताच्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत संबंधित सर्वांचे आभार मानले. भविष्यातही नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
