बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रमुख नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे यांनी भंडारा येथे अभुतपूर्व जनसामान्य जनतेच्या विराट सभेला संबोधित केले.!
भंडारा (जगदीश काशिकर) - खातरोल रेल्वे मैदान येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या आज संपन्न झालेल्या विराट सभेला संबोधित केले. यावेळी भंडाऱ्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी राज्यातील युती सरकार कटिबद्ध असल्याचे मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
भंडारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यातील युती सरकार सकारात्मक असून जिल्ह्यातील विकास कामांसाठी आमच्या आमदाराला ५० नव्हे तर २०० खोके दिले असल्याचे याप्रसंगी निक्षून सांगितले. तसेच जिल्ह्यातील इतर प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यासाठी अजून १०९ कोटींची तरतूद प्रस्तावित असल्याचेही स्पष्ट केले. भंडारा जिल्ह्याला निसर्गाचे मोठे वरदान लाभले आहे त्या अनुषंगाने गोसिखुर्द येथे पर्यटनविषयक अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून आज त्याचा आढावा आपण स्वतः घेतल्याचे यासमयी बोलताना स्पष्ट केले. जिल्ह्यातील काही विकासकामांचेही आज भूमिपूजन केले असून काहींचे लोकार्पण केले आहे. मात्र हा जिल्हा यापुढे दुर्लक्षित राहू नये यासाठी आपण स्वतः प्रयत्न करू अशी ग्वाही मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी देऊन जनतेस आश्वस्त केले. याची सुरुवात म्हणून मुंबई नागपूर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग भंडारा-गोंदिया-गडचिरोली पर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच शहरातील नाट्यगृहासहित इतर सर्व मागण्याही हे सरकार नक्की पूर्ण करेल अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार कृपाल तुमाने, खासदार सुनील मेंढे, भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार डॉ.परिणय फुके, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे विदर्भातील नेते किरण पांडव तसेच बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचे सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


