'ऊर्जा 23 युवा महोत्सवाचे' उद्घाटन संपन्न.!
"विद्यार्थ्यांनी ध्येय ठरवून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे" - मुर्गानंथम एम.उपजिल्हाधिकारी
भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती शिक्षण संस्था ,भद्रावती द्वारा संचालित नीलकंठराव शिंदे कला व विज्ञान महाविद्यालय, भद्रावती, नीलिमाताई शिंदे महिला महाविद्यालय ,भद्रावती, डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय भद्रावती, कै. निळकंठराव शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने 'ऊर्जा 2023' या युवामोहत्सवाचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे व उपजिल्हाधिकारी मुर्गानंथम एम. यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले.
पाच दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी 'ऊर्जा 2023' या युवा महोत्सवा अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती द्वारे संचालित नीलकंठ राव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाच्या प्रांगणात ऊर्जा 23 युवा मोहत्यवाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. या उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावर उद्घाटक म्हणून डॉ. प्रशांत बोकारे, कुलगुरू, गोडवाना विद्यापीठ गडचिरोली , मुर्गानंथम एम. , उपजिल्हाधिकारी, चंद्रपूर, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावतीचे अध्यक्ष, डॉ. विवेक शिंदे , सचिव, डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव, डॉ. विशाल शिंदे, प्राचार्य डॉ. एल.एस. लडके उपस्थित होते .
कार्यक्रमाला स्व. निलकंठराव शिंदे, संस्थापक, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले , हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ' ऊर्जा 2023 या युवा महोत्सवाचे ' उद्घाटन डॉ. प्रशांत बोकारे, कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या हस्ते बलून हवेत सोडून करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कुलगुरु ,डॉ. प्रशांत बोकारे यांनी " विद्यार्थ्यांनी स्वतःला ओळखून आपले ध्येय निश्चित करावे व ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, आपण भारताचा आधारस्तंभ आहात .तेव्हा आपल्या ठिकाणी असलेल्या ऊर्जेचा विधायक कार्यासाठी वापर करावा" असेही मार्गदर्शन केले . तर मुर्गानंथम एम. उपजिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना "परिश्रमाने आपल्याला यश प्राप्त करता येते , चिकाटीने अभ्यास करण्याची गरज आहे . अडथळ्यांना पार करत आपल्याला यशापर्यंत जायचे आहे" असे मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. लेमराज लडके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ऊर्जा 2023 या कार्यक्रमानिमित्त विविध कार्यक्रमांसोबतच रक्तदान शिबिर, भव्य मॅरेथॉन स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अपर्णा धोटे यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव डॉ. कार्तिक शिंदे यांनी केले .
कार्यक्रमाला मोठ्या संख्येत विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, पालक उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली.

