श्री गजानन महाराज भक्तांची मांदियाळी - पुष्प त्रेचाळिस - कसुऱ्याची गुजाबाई


शेगांव (वि.प्र.) - गजानन महाराजांनी समाधी घेतल्यानंतर नागोजींची पत्नी गुजाबाई हिने यज्ञ केला होता. समाधी मंदिराच्या चौफेर बांधलेल्या बांधकामात काही अंशी दान दिले होते. गजानन विजय ग्रंथामध्ये गुजाबाईच्या नावाचा उल्लेख आला आहे. 
"कसुऱ्याची राहणार | 
गुजाबाई नाम जिचे ||" 
समाधीच्या पुढे झालेल्या अनेक यज्ञांपैकी एक यज्ञ गुजाबाई यांनी केला होता.
कळंबा, कसुरा ही दोन्ही छोटी छोटी गावे शेगाव जवळच आहेत. मन नदीच्या काठावर वसलेली ही गावे जरी छोटी असली तरी गजानन महाराजांच्या चरणस्पर्शाने पवित्र झाली आहेत. मन ही नदी पूर्वीच्या काळात विश्वामित्र या नावाने ओळखली जाई. या परिसरात गजानन महाराजांचा मुक्तपणे संचार असायचा. अनेक भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी हा अवतार धारण केला होता. असंख्य भक्तांचे भौतिक आणि आधिदैविक दैन्य, दारिद्र्य दूर करण्यासाठी ते धावून जात. महाराज ब्रह्मनिष्ठ असल्याने भक्तांच्या इच्छेसाठी त्यांना धावून जावे लागे. 
गजानन महाराज एकदा कसुरा या गावात गेले. नागझरीवरून या गावात जाण्यासाठी रस्ता आहे. मन नदीच्या काठावर नागोजी रामजी ताथोड पाटील यांचा मळा रस्त्यालगतच आहे. रस्त्याच्या बाजूने विहीर असून या विहिरीवर मोटेने पाणी देण्याची व्यवस्था केलेली होती. गजानन महाराज आपल्या ब्रह्मानंदात तल्लीन असत. कसुरा येथील या मळ्यातील विहिरीच्या काठावर ते येऊन बसले. महाराजांचा अवतार असा होता की त्यांनी आपले स्वरूप जगाला कळू नये म्हणून पिसेपणाची पासोडी पांघरलेली होती.
नागोजी यांची पत्नी गुजाबाई अतिशय सात्विक आणि संतांवर श्रद्धा, भक्ती असलेली होती. नागोजी हे वैभवसंपन्न गृहस्थ. गजानन महाराज जेव्हा सुरुवातीच्या काळात फिरत फिरत त्यांच्या मळ्यातील विहिरीवर येऊन बसले, त्यावेळी त्यांना महाराजांविषयी काही कल्पना नव्हती. हा शेगावचा अवलिया आहे, एवढेच त्यांचे मत होते. मात्र नंतर महाराजांनी त्यांच्यावर कृपा केली. ते महाराजांचे भक्त बनले. नागोजी सन १९२९ मध्ये स्वर्गवासी झाले.
गुजाबाई आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पाहावा.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.