शेगांव (वि.प्र.) - शेगावच्या पश्चिमेला 12 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या जलंब या गावातील जोशी कुटुंबात आत्मारामपंतांचा जन्म झाला. अतिशय सुसंस्कृत अशा तुळशीरामपंत जोशी यांचा वारसा त्यांनी चालवला. आत्मारामपंत अतिशय तल्लख आणि एकपाठी होते. एकदा काही वाचले की ते तात्काळ त्यांच्या स्मरणात राहत असे. त्यांची वेदांवर अतिशय श्रद्धा होती. बालपणापासून घरातील वातावरण संस्कारमय असेच होते. घरामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी वेदातील मंत्रांचे पठण होत असे. हे संस्कार त्यांना पुढील आयुष्यात खूप उपयोगी पडले. त्यांच्या घरची परिस्थिती जेमतेमच होती. आत्मारामपंतांना वेदाध्ययनाची विशेष आवड असल्याने भागीरथीच्या तटावर असलेल्या धर्मपीठ काशीला ते वेदांचा अभ्यास करण्यासाठी गेले. भागीरथीचे स्नान करून माधुकरीचे अन्नग्रहण करून अध्ययनाला ते गुरुग्रही नियमितपणे जात असत. त्यांनी आपले सर्व लक्ष वेदांच्या अभ्यासामध्ये केंद्रित केले. ते सदाचारी आणि विवेकबुद्धीचे असल्याने शास्त्र अभ्यासाच्या सर्व अटींचे पालन त्यांनी काटेकोरपणे केले.
वेदांचे शिक्षण पूर्ण करून ते वाराणसीहून शेगावला आले. सर्वप्रथम त्यांनी गजानन महाराजांच्या चरणी आपली हजेरी लावली. महाराजांचे दर्शन घेतले. शेगावात आल्यापासून ते दररोज मठात जात असत. त्यांची महाराजांवर अतिशय श्रद्धा होती.
आत्मारामपंत मठात आले की शंकराचे दर्शन घेत आणि तेथे शुक्ल यजुर्वेदीय रुद्र म्हणत असत. महाराज तेथे निजानंदी बसलेले असत व त्यांच्या समोरच पंतांचे वेदमंत्राचे उच्चारण होत असे. आत्मारामपंत वेद जाणणारे तर गजानन महाराज ज्ञानसविता होते. आत्मारामपंत महाराजांना वेदाचे पाठ म्हणून दाखवत. परंतु उच्चारणात कधी कोठे चुका होऊ लागल्या की त्या चुका महाराज दुरुस्त करून देत एवढेच नव्हे तर त्यांच्याबरोबर वेदसुद्धा म्हणत असत. असे महाराजांचे स्पष्ट उच्चार पंडितांनाही लाजवणारे होते. त्यांना सर्व छंद मुखोद्गत होते. हे पाहून आजूबाजूला असलेली भक्तमंडळी आणि विद्वान श्रोते मंडळी तन्मयतेने डोलत असत.
मी काशीला जाऊन वेद शिकण्यासाठी सर्व शास्त्राच्या नियमांचे पालन केले. परंतु माझा विधाभ्यास महाराजांसमोर कच्चा आहे. तेव्हा महाराज कुठे आणि केव्हा वेद शिकले असतील? सर्व वेद त्यांना पाठ कसे? ते जर वेदशास्त्र संपन्न आहेत, तर ते अवलियासारखे का बरे वागतात? याची त्यांना जरुरी का बर आहे? ज्ञानसंपन्न माणसाला असे करणे शक्य तरी आहे का? असे प्रश्न आत्मारामपंत यांना सतावू लागले. महाराजांनी हे जाणले आणि आपल्या खऱ्या स्वरूपाची जाण करून दिली. त्यांच्या सर्व शंकांचे निरसन झाले. त्यापूर्वीही ते महाराजांना मानीत असत. परंतु आता मात्र त्यांना कळून चुकले की महाराज सामान्य संत नसून ते प्रत्यक्ष सप्तर्षीपैकी एक आहेत. जगाला याची माहिती होऊ नये म्हणून त्यांनी मुद्दाम हे वेडेपण पांघरले आहे. असे उच्च कोटीतील अवतारी संत आत्माराम यांना लाभले. तेव्हा त्यांनी महाराजांनाच गुरु मानले.
गुरुगीतेत म्हटल्याप्रमाणे,
"विद्या धनम् बलम् चैव, तेषाम् भाग्य निरर्थकम् |
एषाम् गुरुकृपा नास्ती, अधो गच्छतीम् पार्वती ||"
"जास्त सद्गुरूची कृपा नाही, त्याची विद्या, धन, बल आणि भाग्य निरर्थक आहे" असे भगवान शंकर पार्वतीला सांगतात. आत्माराम यांना सद्गुरू कृपा प्राप्त झाली होती. त्यांच्या भाग्याचा उदय झाला. आता ही विद्या डोक्यावर घेऊन विद्वान म्हणवून घेण्यापेक्षा अशा थोर सद्गुरूंची सेवा करत राहणे हीच श्रेष्ठ गोष्ट आहे. यातच जीवनाचे खरे कल्याण आहे. त्यांनी स्वतःला महाराजांच्या चरणी समर्पित केले. ते महाराजांसाठी रुद्राचे उच्चारण करू लागले. महाराजांनीही त्यांचे अंत:करण ओळखले. महाराजसुद्धा पंतांवर प्रसन्न होते. महाराजांच्या सेवेसाठी ते जलंब येथून नियमितपणे येत असत.
महाराजांच्या संकेताप्रमाणे त्यांनी नंतर गृहस्थधर्माचे पालन केले. महाराज जेव्हा पंतांच्या घरी जलंब येथे पहिल्यांदा गेले, तेव्हा "आज प्रत्यक्ष भगवंत आपल्या घरी आला आहे" असे त्यांना झाले होते. परिस्थिती गरिबीची असल्याने महाराजांना बसवण्यासाठी त्यांनी शेजारून एक चौरंग तात्पुरता मागून आणला आणि त्यावर महाराजांना बसवून त्यांची पूजाअर्चा केली. पुढे दुसऱ्यांदा महाराज घरी आले. तेव्हा त्यांनी स्वतः एक चौरंग बनवला, व्याघ्रांबर ठेवले आणि त्यावर महाराजांना बसवून त्यांची पूजाअर्चा केली. आजही या वस्तू त्यांच्या घरी त्यांचे नातू गजानन जोशी यांनी सांभाळून ठेवल्या आहेत.
गजानन महाराजांनी १९१० मध्ये समाधी घेतल्यानंतर सुद्धा त्यांच्या समाधीची पूजा-अर्चा करण्यासाठी पंत मठात जात असत. त्यांनी पूजाअर्चा करण्याचा मोबदला कधीही घेतला नाही. ती त्यांच्या सद्गुरु गजाननाची पूजा होती. अशा या विद्वान, वेदविद्याविभूषित भक्ताचे मार्गशीर्ष महिन्यात सन १९६४ मध्ये निधन झाले.
आत्मारामपंत जोशी आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पाहावा.