शेगांव (वि. प्र.) - साधारण सन १८९४-९५ मधली घटना असेल, दर्शनाला येणाऱ्या भक्तांना त्रासून गजानन महाराज बरेचदा इतरत्र कोठेही निघून जात. असेच एकदा ते सर्वांची नजर चुकवून बाळापूरला निघून गेले. बाळापुर हे गाव शेगाव पासून १३-१४ किलोमीटर अंतरावर आहे. त्या गावात सुकलाल नावाचा एक सात्विक गृहस्थ राहत होता. बाजारपेठेच्या रस्त्यावरच यांचे घर होते. महाराजांची स्वारी त्यांच्या घराच्या बैठकीसमोर जाऊन बसली. अवघी दिगंबर मूर्ती. रस्त्यातून येणारे जाणारे नमस्कार करून पुढे जात होते. त्या लोकांमध्ये नारायण आसराजी हा पोलीस हवालदार होता. त्याची नजर या दिगंबर योग्यावर पडली. हवालदाराचे डोके फिरले. महाराजांच्या जवळ जाऊन तो त्यांना अद्वातद्वा बोलू लागला. उच्च स्वरात उर्मटपणे बोलून हातातील काठीने तो महाराजांना मारू लागला. हे दृश्य पाहून यशवंत हुंडीवाला नावाचा एक गृहस्थ तेथे धावत आला. हुंडीवाला तेथील मोठे दुकानदार होते. ते त्या हवालदाराला म्हणाले की, "सत्पुरुषावर उगीचच हात टाकणे बरे नाही. त्यांच्याकडे तू या केलेल्या गुन्ह्याची माफी माग. ते तुला माफ करतील."
यशवंत हुंडीवाला हे धनसंपन्न गृहस्थ होते. महाराजांविषयी त्यांना अत्यंत भक्ती होती.
संतांना त्रास देणारे महाभाग आजही काही कमी नाहीत. भोंदू साधू सर्वत्र वावरत असतात. परंतु सर्वांनाच त्या नजरेतून बघावे, भोंदू मानावे असे नाही. चांगले उत्तम दर्जाचे साधू देखील आपल्या आसपास वावरत असतात. "साधूशिवाय, सज्जनाशिवाय गाव नाही" हे प्रथम मनाशी समजून घेतले पाहिजे. संत आपल्याकडे काहीही मागत नाहीत. आपली इच्छा झाल्यास त्यांना दान द्यावे, अन्यथा दिले नाही तरी काही बिघडत नाही. मात्र त्यांची निंदा करू नये, त्यांना यातना देणारे भाषण ऐकवू नये. संतांशी फार विचारपूर्वक बोलले पाहिजे. काही लोकांना संतांजवळ जाऊन त्यांच्याशी वादविवाद करण्याचा छंद असतो. तो टाळला पाहिजे. आपली त्यांच्याशी होणारी वादविवाद स्पर्धा घातक ठरू शकते. म्हणून त्यांच्यासमोर वाचाळ, व्यर्थ बडबड करू नये. त्यांची कृपा व्हावी, अशी इच्छा असेल, तर सर्वप्रथम अंगी नम्रता बांधली पाहिजे. नम्र माणसाला पाहून त्यांच्या हृदयातील ज्ञानाला झरा फुटतो आणि मग तेथे ज्ञानदानाला तोटा रहात नाही. आपण त्यांच्या पाया पडावे किंवा त्यांना मानसन्मान द्यावा असा त्यांचा आपल्याकडे आग्रह नसतो. त्यामुळे उगीचच त्यांची टिंगल किंवा अपमान करू नये.
यशवंत हुंडीवाला यांच्यासारखा सज्जन व्यक्ती आपल्या आसपास असतात. त्यांनी दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नये.
यशवंत हुंडीवाला आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पाहावा.