श्री गजानन महाराज भक्तांची मांदियाळी - पुष्प - छत्तीसावे - श्री. राजे रघुजी भोसले (चौथे)

शेगांव (वि.प्र.) - भक्तांचा शोध घेत घेत त्यांच्यावर कृपा करण्यासाठी श्री. गजानन महाराज त्या त्या स्थळी जात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करत. राजे मुधोजी अजितसिंह भोसले (नागपूर) यांनी ऐकीव माहितीनुसार थोडी माहिती दासभार्गवजींना दिली. श्री. दासभार्गवजी ह्यांनी त्यांच्या वाड्यावर श्री. विजयराव सूर्यवंशी,डॉ.सौ. मालाबाई इंगळे तसेच श्री. पी. एस. ढोले यांच्या सोबत जाऊन त्यांची मुलाखत घेतली. त्यांनीही श्रद्धापूर्वक अंतःकरणाने पुढील माहिती दिली.
श्री. गजानन महाराजांवर राजे रघुजी भोसले यांची फार श्रद्धा होती. त्याचप्रमाणे अनेक संतही त्यांच्या वाड्यावर येत असत व त्यांची तेथे सेवा केली जात असे. त्यामध्ये श्री. गजानन महाराजांप्रमाणेच प्रामुख्याने ताजुद्दीन बाबा हे बऱ्याचदा भोसलेंच्या वाड्यावर येत असत. असेच एकदा ताजुद्दीन बाबा भोसलेंच्या वाड्यात आले असता, गजानन महाराज गोपाळ बुटी ह्यांना न सांगताच परस्पर वाड्यात आले. भोसलेंच्या वाड्यात या दोन महासंतांची भेट होवून त्यांचा सामान्य माणसांना न कळणारा सांकेतिक असा संवाद झाला.
श्री गजानन महाराज छोटा ताजबाग येथे येवून श्री ताजुद्दीन बाबांना भेटत असत. या घटनेबाबतीत ह.भ.प. वासुदेव महाराज लिहितात,
'ताजुद्दीन बाबांनी भले! श्री गजानना श्री वंदिले! 
परस्पर आनंदले! ते गुह्य नाही कळले कुणा!!'
'रघुजीराव नृपाचे घरी! दोन दिवस होती गुरूंची स्वारी! भोजन करून सत्वरी! आले माघारी शेगावी!!'
या सर्व गोष्टींवरून रघुजींच्या वाड्यावर महाराजांचे येणे जाणे असायचे हे पटते. रघुजींच्या वाड्यावर दोन दिवस महाराजांचे वास्तव्य होते असे त्यांच्या घराण्यातील लोक आज देखील सांगतात. तसा उल्लेख ह. भ. प. वासुदेव महाराजांनीही केला आहे व हे खरोखरीच सत्य आहे. महाराजांच्या वास्तव्याने बुटी यांच्या वाड्याप्रमाणेच राजे रघुजी भोसले यांचा वाडा देखील पवित्र झाला आहे. श्री गजानन महाराज तेथील लक्ष्मीनारायण मंदिरातही बसत असत. त्यांनी श्री गणेशोत्सवाचा कार्यक्रम येथे बसून बघितला होता, त्याचप्रमाणे हिरासिंग बाबांच्या समाधी परिसरात ताजुद्दीन बाबा व श्री गजानन महाराज बसत असत असे रघुजीराजांचे पणतू यांनी माहिती दिली.
राजे रघुजी (४थे) यांची सर्व संतांवर खूप श्रद्धा होती. त्यांनी अनेक संतांची सेवा सुश्रुषा केली होती. श्री गजानन महाराज त्यांच्याकडे आले की, त्यांच्या आनंदाला भरते येत असे. त्यांच्या वाड्यात जेव्हा जेव्हा श्रींचा मुक्काम असे तेव्हा तेव्हा महाराजांची आंघोळ व पूजाअर्चा ते स्वतः करीत असत असे कळते. या गोष्टींवरून महाराजांवरील त्यांची श्रद्धा व भक्ती दिसून येते.
श्री गोपाळराव बुटींकडे महाराज असतानाच्या या सर्व लिलांपैकी एक अतिशय महत्त्वपूर्ण लिला महाराजांनी केली ती पुढील प्रमाणे. श्री गजानन महाराजांना शेगावी परत आणण्यासाठी ह भ प कुकाजी पाटील हे नागपूरला बुटींकडे आले. दि. ०३-०१-१९०८ रविवार, (साधना द्वादशी) ला श्रींनी बुटींचा वाडा सोडला व आपल्या शेगावच्या भक्तांसह ते राजे रघुजी भोसले यांच्याकडे आले. तेथे दोन दिवस म्हणजे ०३ व ०४ तारखेला तेथे राहिले. रघुजींचा पाहुणचार श्रींनी स्वीकारला. दिनांक ०५-०१-१९०८ रोजी भोसलेंकडून रामटेक क्षेत्री जाण्यास प्रस्थान केली. श्रींची रामटेक ला जाण्याची सर्व व्यवस्था गोपाळराव बुटी व रघुजी राजे यांनी केली. महाराजांसोबत हरी पाटील, जगु आबा पाटील, श्रीं चे सेवक बाळाभाऊ महाराज त्याचप्रमाणे दुधाहारी बुवा व इतर सेवक देखील असल्याचे समजते.
महाराजांनी राजे रघुजी भोसले यांच्याकडे असताना रामटेकला जाण्याचा उच्चार केला. महाराजांना रामटेक क्षेत्री नेण्याची जय्यत तयारी सुरू झाली. रेल्वेचा स्पेशल डबा बुक करण्यात आला. रघुजी राजे व गोपाळराव यांनी सर्व व्यवस्था केली. सर्व जण रामटेकला येऊन पोहोचले. महाराजांच्या नावाचा सर्वत्र जयघोष सुरू झाला. राजे प्रत्यक्ष महाराजांच्या सेवेला होते. रामटेक रेल्वे स्टेशन पासून श्रींना गडावर नेण्यासाठी पालखीची व्यवस्था करण्यात आली होती. महाराजांच्या पालखी मागे राजे रघुजी भोसले, गोपाळराव बुटी, सदाशिव लाखे, मृत्युंजय लाखे त्याचप्रमाणे शेगाव वरून आलेली सर्व सेवक मंडळी पायी चालत होती. सर्वजण आनंदाने 'श्री गजानन महाराज की जय' असा जयघोष करीत होते.
बुटी यांच्या माध्यमाने श्रींनी सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण केल्या व त्या परिसरात असंख्य लिला दाखविल्या. या लेखामध्ये उपलब्ध झालेली माहिती श्रीदासभार्गवजी यांनी नागपूर व रामटेक येथे जाऊन मुलाखतींद्वारे उपलब्ध केली. 
श्री राजे रघुजी भोसले आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री. गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.