शेगांव (वि.प्र.) - सन १९०७ मधील घटना. पंजाब प्रांतातील बिरबलनाथ यांची बारा वर्षांची तपश्चर्या फळाला आली. पूर्णपणे संन्यस्त असलेले आणि ब्रह्मचर्य पालन करणारे बिरबलनाथ शंकराचे उपासक होते. त्यांनी शंकराची बारा वर्षे तपश्चर्या केली. त्यांची तपश्चर्या पाहून भगवान श्री शंकर प्रसन्न झाले आणि त्यांच्यासमोर प्रकट होऊन म्हणाले, "बिरबला, तुझी काय इच्छा आहे? जे मागायचे असेल, ते माग." बिरबलनाथांनी डोळे उघडून पाहिले. तो समोर साक्षात श्री शंकर उभे होते. त्यांनी शंकरांना साष्टांग नमस्कार केला आणि म्हणाले, "प्रभू ! चौऱ्यांशी लक्ष योनी फिरून मी त्रासलो आहे. आता मला या जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त करावे आणि मोक्षपद द्यावे. एवढीच माझी इच्छा आहे. बिरबलनाथाचे मागणे ऐकून भगवान शंकर त्यांना म्हणाले, "अरे ! सद्गुरु वाचून कोणीही मोक्ष देऊ शकत नाही. तेव्हा वऱ्हाड प्रांतामध्ये शेगाव या गावी तू जा. तेथे महासंत गजानन आहेत. त्यांच्यावर दृढ श्रद्धा ठेवून तू त्यांना शरण जा. गजानन पूर्णपणे भक्ताधीन आहे. तोच तुझी इच्छा पूर्ण करेल." असा उपदेश करून भगवान शंकर गुप्त झाले.
बिरबलनाथ मार्गक्रमण करीत मोठ्या आतुरतेने विदर्भास येण्यास निघाले. दिनांक ७/६/१९०७ या दिवशी बिरबलनाथ गजानन महाराजांसमोर उपस्थित झाले. सद्गुरूंनी त्यांना ओळखले. सद्गुरूंच्या सहवासात बिरबलनाथ राहू लागले. महाराजांनी नाथांना उपदेश केला. आत्मबोध केला. आत्मसाक्षात्कार करवून दिला. मात्र महाराजांनी त्यांना जास्त दिवस आपल्या जवळ न ठेवता कोंडोलीस जायला सांगितले.
पावसाळ्याचे दिवस होते. तरीही सद्गुरूंची आज्ञा घेऊन बिरबलनाथ कोंडोलीला निघाले. कोंडोलीत नाथांनी शंकराच्या मंदिराचा आसरा घेतला. तेथेच ते धूनी लावून बसले. कोंडोली गावात सर्वत्र चर्चा सुरू झाली. लोक नाथांच्या दर्शनाला येऊ लागले. एके दिवशी गजानन महाराजांचे शिष्य पितांबर सुद्धा तेथे आले. दोन्ही गुरुबंधांची भेट झाली. त्या भेटीचा आनंद त्यांच्या दृष्टीनेसुद्धा अवर्णनीयच होता.
बिरबलनाथांना कोंडोलीला पाठवण्यामागे महाराजांचा उद्देश एवढाच होता की, तुझ्या गुरुबंधूकडे पितांबराकडे तू काही दिवस राहा. तेथे स्वतःला घासून, पुसून, तपासून घे. सद्गुरु गजानन महाराजांच्या या कृपासंकेतानुसार पितांबरांनीही आपल्या गुरुबंधूला सांगितले, "संताचे लक्ष केवळ परमात्म्याकडे असते. त्याने साक्षी भावाने जीवन घालवावे. जे ईश्वराचे खरे भक्त आहेत, त्यांच्या अंतःकरणातील भाव आणि श्रद्धा जाणून त्यांचा उद्धार करावा. भक्त हे संताच्या चरणाचे दास असतात. तेव्हा संताने भक्तांचा नायक बनून त्यांचा ईश्वरावरील भाव वाढवावा. दृढ करावा. वेळोवेळी त्यांचे संकटापासून रक्षण करावे. स्वतःचे काम, क्रोध, मद, मत्सर आदी जाळून दंभ टाळावे. संन्यस्त स्थितीत राहावे. जो भाविक असेल त्याचा उद्धार करावा. संताचा जन्म केवळ यासाठीच असतो." अशा प्रकारे पितांबरांनी बिरबलनाथांना बोध केला.
अशा प्रकारे संत पदाला पोचलेल्या, प्रसिद्धीपासून दूर असलेल्या गजानन महाराजांच्या या थोर शिष्याने आपल्या जीवनाचा पुढचा काही काळ मंगळूरपीर येथे भक्तांच्या कल्याणासाठी घालवला.
बिरबलनाथ आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.