शेगांव (वि.प्र.) - जयरामबुवा भामटे यांचे मुळगाव अचलपूर (जिल्हा अमरावती). शेती हाच त्यांच्या घरचा व्यवसाय होता. घरची परिस्थिती जेमतेमच होती. त्यामुळे शिक्षणाचा अभाव असे. या कारणाने जयरामबुवा दुसरीपर्यंतच शिकले आणि पुढे आपल्या वडिलोपार्जित व्यवसायात गुंतले. उदरनिर्वाहासाठी पुढे ते बाळापूर तालुक्यातील विवरा या खेडेगावात येऊन स्थायिक झाले. शेतात ज्यूट पेरून ते तागाचे उत्पादन करु लागले. त्यावेळी तागाला चांगली मागणी असल्याने त्यांनी तागाचा व्यवसाय सुरू केला. तयार झालेला ताग ते अकोल्याच्या बाजारपेठेत विकायला नेत असत. त्यांचा साधू संतांवर विश्वास होता. श्रद्धा होती. एका ईश्वरावाचून आपणास कोणीही सहाय्य करत नाही, असा अनुभव त्यांनाही आला होता.
एकदा ते ताग विकण्यासाठी अकोल्याला गेले. तागाने भरलेली बैलगाडी बाजारपेठेत नेत असताना त्यांना समजले की, शेगावचे कोणी एक अवलिया बाबा खटाऊशेठच्या बंगल्यावर आले आहे. हे कळताच बैलगाडी बाजारात न नेता, ते सरळ खटाऊशेठच्या बंगल्याजवळ आले. त्यांनी बैलगाडी उभी केली आणि बंगल्याच्या फाटका जवळ गेले. त्यांच्या अंगातील फाटका सदरा, मळकट धोतर, खांद्यावर एक शेला आणि काळासावळा रंग असा अवतार पाहून फाटकाजवळचा कुत्रा भुंकू लागला. त्यांच्या अंगावर धावून गेला. त्यावेळेस गजानन महाराज फाटकाजवळच वऱ्हांड्यात बसले होते. कुत्रा भुंकताच त्यांनी ते अंतर्ज्ञानाने जाणले आणि फाटकाजवळ धावून आले. कुत्र्यावर ओरडून गजानन महाराज म्हणाले, "पूर्वजन्मीचे वैर तू अजून विसरला नाहीस?" असे म्हणताच कुत्रा गप्प झाला. जयरामबुवांचा हात धरून गजानन महाराजांनी त्यांना आत वऱ्हांड्यात आणले. दुपारची जेवणाची वेळ होती. ताटे वाढलेली होती. त्यातील एक ताट महाराजांनी जयरामबुवांच्या समोर ठेवले आणि म्हणाले, "हा घे प्रसाद. तुझे काम फत्ते होईल. पुढचे सर्व आम्ही बघून घेऊ." जयरामबुवांनी महाराजांना प्रथमच बघितले होते. त्यांची कीर्ती ऐकिवात होती. महाराजांनी प्रसाद आणि आशीर्वाद दिल्याने जयरामबुवांना अतिशय आनंद झाला. आनंदाच्या भरात बैलगाडी घेऊन ताग विकायला बाजारपेठेत गेले. त्या दिवशी महाराजांच्या कृपेने तागाला भरपूर भाव येऊन त्यांचा संपूर्ण ताग विकला गेला. 
जयराम बुवांची महाराजांवर श्रद्धा बसली. ते गजानन महाराजांच्या दर्शनाला वारंवार येऊ लागले. महाराजांच्या आशीर्वादाने तागाच्या धंद्यात त्यांना खूप नफा होऊन त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली. तरीही ते दर्शनाला मात्र न चुकता येत असत. 
एक दिवस शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला जयरामबुवा आले. महाराजांचे दर्शन घेऊन त्यांच्या जवळच बसले. त्या रात्री महाराजांनी त्यांना ज्ञानेश्वरीवर कीर्तन करण्याचा आदेश दिला. गजानन महाराजांनी जयरामबुवांना त्यावेळी शक्तिपात देऊन कृपा केली. त्यांच्यात शक्तीसंचार केला. त्यांनी आपले आयुष्यातले पहिले कीर्तन गुरूंच्या आदेशाने गुरूंच्या समोरच ज्ञानेश्वरीवर केले. कीर्तन असे रंगले की ऐकणारे मंत्रमुग्ध होऊन गेले. सद्गुरूंची ही सगळी किमया! जणू काही तेच आपल्या शिष्याच्या मुखातून बोलत होते. पुढे तिसऱ्या दिवशी जयरामबुवांना गजानन महाराजांनी आपल्या गावी परत जाण्याची परवानगी दिली.
गजानन महाराजांची हातोटी अगदी वेगळी होती. त्यांनी आपल्या संपर्कात आलेली अंतरंगातील शिष्यमंडळी पूर्णपणे सिद्ध करूनच भवसागरात पाठवली. त्यांची पद्धत गुरुकुलाप्रमाणे होती. पण शिकण्यासाठी अनेक वर्षे राहावे लागत नसे. गजानन महाराज आपल्या शिष्यात आपली शक्ती संक्रमित करून कार्य करून घेत असत. 
शक्तीसंचार झालेली व्यक्ती अंतर्मन जागृत होऊन आपल्या वेगळ्याच विश्वात वावरते. सद्गुरूंची प्रेरणा / कृपा होऊन त्यांची कुंडलिनी शक्ती जागृत होते. जागृत झालेली कुंडलिनी त्या त्या चक्रात स्थिर होते आणि अज्ञानी माणूसही असाधारण संत बनू शकतो. तो सर्वसामान्य माणूस राहत नाही. भाग्यवान माणसालाच अशी संधी लाभते. त्यासाठी पाठीशी गुरुकृपा पाहिजे.
पुढे जयराम बुवा पत्नीसोबत सातपुड्यात मुक्तागिरीला आले. तेथे त्यांनी चौदा वर्षे तपश्चर्या केली. तपश्चर्या सफल झाली. त्यांना वाकसिद्धी प्राप्त झाली. ते गजानन महाराजांच्या कृपेने ज्ञानेश्वरीवर प्रवचन करू लागले. सर्व दूर कीर्ती पसरली. ठिकठिकाणी प्रवचने झाली. 
आता ते भामटे महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. अमरावतीत त्यांना मानणारी पुष्कळ मंडळी होती. पुढे अमरावतीजवळ त्यांनी एक आश्रम स्थापन केला. तेथेच एका झोपडीत ते राहू लागले. हा आश्रम अकोली रोड अमरावती येथे आहे. त्याकाळी तेथे नुसती झोपडी होती आणि आजूबाजूने घनदाट झाडी होती. आता त्या जागेवर एक भव्य मंदिर उभे झाले आहे. भामटे महाराजांचे अनेक शिष्य होते. 
गजानन महाराजांनी भामटे महाराजांना संतत्व पदाला पोहोचवले. भामटे महाराजांनी आयुष्यभर गजानन महाराजांच्या तत्त्वाचा अंगीकार केला. गजानन महाराजांचा सहवास ज्यांना लाभला ते किती भाग्यवान आणि ज्यांच्यावर गजानन महाराजांची खरी अध्यात्मिक कृपा केली, त्यांना तर महाभाग्यवान म्हटले पाहिजे.
जयरामबुवा भामटे आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.
