मुंबई (जगदीश काशिकर) : १३ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी एकच्या सुमारास दिल्लीच्या संसद भवनातील लोकसभेत दोन तरुणांनी अचानक प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या घेतल्या. त्यांना खासदारांनी अडवायचा प्रयत्न केला असता त्यांनी बुटातून पिवळ्या रंगाचा धूर देखील उडवला आणि लोकसभेच्या सभागृहात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सभापतींच्या आसनाकडे भाव घेण्याचाही त्यांचा प्रयत्न होता मात्र खासदारांनी त्यांना अडवले.
त्याचवेळी त्यांचे दोन साथीदार संसदेबाहेर घोषणा देत होते, तर उर्वरित दोन साथीदार या घोषणांचे चित्रण करून सर्वत्र व्हायरल करण्यात व्यस्त होते. काही क्षणात हा प्रकार समाजमाध्यमांवर तर व्हायरल झालाच. मात्र त्याचबरोबर सर्व वृत्तवाहिन्यांनी हा लाईव्ह दाखवल्यामुळे संपूर्ण देशभर एक दहशत तिचं वातावरण निर्माण झालं होते.
विशेष म्हणजे ही घटना १३ डिसेंबरला घडली .त्या दिवशीपासून बरोबर बावीस वर्षांपूर्वी म्हणजेच १३ डिसेंबर २००१ रोजी देखील संसदेवर हल्ला झाला होता. मात्र त्यावेळी संसदेत शिरलेले दहशतवादी होते. मिळालेल्या माहितीनुसार ते पाकिस्तानातून प्रशिक्षित होऊन आलेले होते. त्यांनी सोबत एके फोर्टी सेवन गन आणि हॅन्डग्रेनेड्स आणले होते. संसदेत येताच त्यांनी गोळीबार करून आणि हँडग्रेनेडचा वापर करून दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र सुरक्षा रक्षक आणि दिल्ली पोलिसांनी त्यांना अडवले आणि झालेल्या झटापटीत ते पाचही अतिरेकी मारले गेले. या प्रकारात नऊ सुरक्षारक्षक आणि पोलीस हे देखील शहीद झाले होते. नंतर पोलिसांनी या प्रकारातील चार सूत्रदारांना लगेचच अटक केली. त्यांच्यावर खटलाही चालला. त्यातील एक म्हणजेच अफजल गुरूला फाशी देण्यात आली. तर एकाला दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. दोन अतिरेकी सूत्रधार पुराव्याअभावी निर्दोष सुटले.
त्यावेळी देशाच्या लोकशाही व्यवस्थेतील सर्वोच्च सदनावर हा असा अतिरेकी हल्ला झाला होता. त्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. मला आठवते त्यावेळी नागपुरातही महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होते. मी तेव्हा विधान परिषदेत वृत्तसंकलन करीत होतो. प्रश्नोत्तराचा तास संपून लक्ष्यवेधी सूचना सुरू झाल्या होत्या. त्यावेळी काही कामाने बाहेर गेलेले काँग्रेसचे विधान परिषद सदस्य रामदास फुटाणे सभागृहात आले आणि सुरू असलेल्या चर्चेत हस्तक्षेप करीत त्यांनी सभागृहाला माहिती दिली की संसदेवर अतिरेकी हल्ला झाला आहे. हे वृत्त ऐकताच विधान परिषदेचे तत्कालीन सभापती प्रा. ना.स.फरांदे यांनी तात्काळ सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी स्थगित केले होते. आम्ही प्रेस गॅलरीतून सर्व पत्रकार बाहेर धावलो आणि समोरच असलेल्या भाजप विधिमंडळ कार्यालयातील टीव्हीवर थेट प्रक्षेपण बघू लागलो. जे काही बघत होतो ते धडकी भरवणारेच होते. त्या दिवशी नंतर पुन्हा एक तास कामकाज तहकूब झाले. कामकाज सुरू झाले तेव्हा तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहाला माहिती दिली आणि नंतर विरोधी पक्षनेते नितीन गडकरी तसेच गृहमंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभर तहकूब करावे अशी सूचना केली. त्यामुळे कामकाज तहकूब झाले होते. या घटनेचा तणाव दीर्घकाळ टिकला होता.
या दरम्यान पुलाखालून बरेच पाणी गेले. घटनेला बावीस वर्षेही उलटली. ही घटना जुन्या संसद भवनात घडली होती. तर गेल्या आठवड्यात घडलेली ही घटना नव्या संसद भवानात घडली आहे. योगायोग असा की त्या काळातही भारतात अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात भाजपचेच सरकार होते आणि गेल्या आठवड्यात ही घटना घडली तेव्हाही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. अर्थात हा योगायोग की हेतूपुरस्सर घडवून आणलेली घटना याचा शोध घ्यावा लागणार आहे.
२००१ साली संसदेत शिरलेले पाकिस्तानी अतिरेकी होते. ते प्रशिक्षित होते आणि शस्त्रसज्जही होते. मात्र यावेळी संसदेत शिरलेले सर्व भारतीय तरुण आहेत.ते अशा दहशतवादी कृत्यांसाठी प्रशिक्षीत असावे असे सकृतदर्शनी तरी वाटत नाही.त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते बेश़बेरोजगारीचा निषेध करण्यासाठी हे कृत्य करीत होते. मात्र बेरोजगारीचा निषेध करण्यासाठी संसदेत घुसून प्रेक्षक गॅलरीत शिरून तिथून खाली उड्या मारायच्या यासाठी बिनचूक नियोजन गरजेचे आहे. ज्यावेळी हे तरुण उड्या मारून पिवळ्या रंगाचा धूर पसरवतात. त्याचवेळी त्यांचे दोन सहकारी बाहेर उभे राहून घोषणा देतात, तर दोन सहकारी ही सर्व दृश्य समाज माध्यमांवर व्हायरल करीत असतात. हे सर्व नियोजनबद्ध काम आहे हे नक्की.
त्यातही जंतर मंतर किंवा रामलीला मैदानावर अशा प्रकारच्या घोषणा देणे वेगळे आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या संसद भवनात प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारून गोंधळ घालणे वेगळे.विशेष म्हणजे हे सर्व तरूण देशाच्या विभिन्न भागातले असून यापूर्वी ते एकदाच भेटले आहेत. बाकी ते समाजमाध्यमांवर एकमेकांशी संपर्कात होते.हे सर्व मुद्दे लक्षात घेतले तर हा प्रकार घडवून आणण्यामागे कोणतीतरी अदृश्य शक्ती निश्चितच सक्रिय आहे अशी शंकाच नव्हे तर खात्री पटण्यास वाव आहे. संसदेत त्रयस्थ व्यक्तीला आत यायचे असेल तर कोणीतरी खासदाराचे शिफारस पत्र गरजेचे असते. हे तरुण भारतीय जनता पक्षाच्या एका खासदाराचे शिफारस पत्र घेऊन आले होते आणि त्या शिफारस पत्राच्या मदतीने त्यांनी प्रवेश पत्र मिळवून प्रेक्षक गॅलरीत प्रवेश केला होता. हा मुद्दा लक्षात घेतला तर आलेली शंका अधिकच दृढ होते.
या घटनेत प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारणाऱ्यांमध्ये सागर शर्मा हा उत्तर प्रदेशातील लखनऊचा तरुण असून तो बारावी उत्तीर्ण झालेला आहे. इ रिक्षा चालवण्याचा त्याचा व्यवसाय आहे. दिल्लीत जाऊन काहीतरी जुगाड करायचा यासाठी तो घरून निघाल्याचे त्याच्या घरच्यांनी सांगितले आहे. दुसरा तरुण मनोरंजन डी हा कर्नाटकातील मैसूरचा आहे. तो कॉम्प्युटर इंजिनियर आहे. एकंदरीत त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी ही चांगली असल्याचे कळते. बाहेर घोषणा देणाऱ्यांमध्ये नीलम सिंह ही ३७ वर्षाची हरियाणातील हिसारची महिला नीटची परीक्षाही उत्तीर्ण आहे. यापूर्वी ती विविध आंदोलनांमध्येही सहभागी झाली होती अशी माहिती मिळते. तिच्याबरोबर असलेला अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूरचा आहे. त्याचे वडील शेतमजूर आहेत. पोलीस भरतीसाठीही त्याने दोनदा प्रयत्न केल्याची माहिती मिळते. मात्र त्याला अपयश मिळाल्याचेही सांगण्यात आले. संसदेबाहेर तो तानाशाही नही चलेगी अशा घोषणाही देत होता. ज्यावेळी नीलमला पोलिसांनी पकडले त्यावेळी आम्ही निषेध करण्यासाठी आलो आहोत असे ती ओरडत होती. तसेच संसदेत मनोरंजन आणि सागर हे देखील त्यांना खासदारांनी अडवल्यावर सांगत होते.
नुसता निषेध करण्यासाठी असे अतिरेकी पाऊल कोणी उचलणार नाही आणि तारुण्याच्या उन्मादात जरी कोणी उचलले तरी इतर त्यांना सहकार्य करतीलच असे नाही. हा मुद्दा लक्षात घेता कोणती तरी त्रयस्थ शक्ती या कृत्याच्या मागे आहे हे नक्की. त्यांना बहुतेक देशातील मोदी सरकारला आणि प्रचलित व्यवस्थेला बदनाम तरी करायचे आहे किंवा भविष्यात निर्माण करावयाच्या एखाद्या धोक्याची रंगीत तालीम तरी करायची आहे अशी शंका घेण्यास वाव आहे. विशेष म्हणजे बरोबर १३ डिसेंबरलाच ही घटना योगायोगाने घडली नाही तर घडवून आणली गेली आहे ही शंका देखील अवास्तव ठरू नये.
या सर्व मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची सखोल चौकशी गरजेची आहे. लोकसभेच्या सभापतींनी उच्चस्तरीय चौकशीची घोषणा केली आहे. तसे आदेशही दिले आहेत. त्या दृष्टीने पावलेही उचलली गेली आहेत. या प्रकारात त्या दिवशी प्रत्यक्षात सहा व्यक्ती गुंतलेल्या होत्या. त्या सहाही व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात आहे. आता या सहा तरुणांकडून खरी माहिती काढून घेणे आणि घटनेच्या मुळापर्यंत जाणे हे पोलिसांचे काम आहे. हे कृत्य करणारे बेरोजगार तरुण आहेत आणि वैफल्यातून त्यांनी असे कृत्य केले असे म्हणत त्यांना सोडून देणे हे शहाणपणाचे ठरणार नाही. यात सखोल चौकशी गरजेची आहे. सखोल चौकशी करून मुळापर्यंत जाऊन देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करण्याची ही मानसिकता ठेचून काढण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने पावले उचलली गेलीच पाहिजेत.
वाचकहो पटतेय का तुम्हाला हे..?
त्यासाठी आधी समजून तर घ्या राजे हो….!
ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
