सार्वजनिक ग्रंथालय संमेलन इतिहास घडविणारा - प्रदीप दाते

सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवणे काळाची गरज - डॉ.ज्ञानेश हटवार 

बल्लारपुर (का.प्र.) : सार्वजनिक ग्रंथालय परिषद व मुस्लिम लायब्ररी भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा जिल्ह्यात घेण्यात आलेले सार्वजनिक ग्रंथालय संमेलन हे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिले संमेलन आहे. भंडारा जिल्ह्याने ग्रंथालयाच्या समस्या सर्वांसमोर मांडण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे, हे संमेलन इतिहास घडविणार असे प्रतिपादन विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी व्यक्त केले.
विदर्भ सार्वजनिक ग्रंथालय परिषद भंडारा व मुस्लिम लायब्ररी भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले सार्वजनिक ग्रंथालय संमेलन भंडारा येथील मुस्लिम लायब्ररीमधिल हॉलमध्ये आयोजित करण्यात आले. या दोन दिवसीय संमेलनात दुसऱ्या दिवशी 'सार्वजनिक ग्रंथालय चळवळ वृद्धिंगत करण्याकरिता ग्रंथालय व्यवस्थापन, कर्मचारी, लोकसहभाग लेखक , वृत्तपत्र आणि शासनाची भूमिका ' तसेच "राज्यातील सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांची उपेक्षा व त्यावरील उपाय योजना" या विषयांवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.
या परिसंवादाचे अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते हे होते. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ मुंबईचे अध्यक्ष डॉ गजानन कोटेवार, भंडारा जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष धनंजय दलाल, ग्रंथालय संघाचे नागपूर विभाग कार्यवाह भाऊराव पत्रे, नागपूर विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ शैलेंद्र लेंडे, संस्कृत विद्यापीठाचे ग्रंथालय संचालक डॉ दीपक कापडे, महाराष्ट्र टाइम्स चे संपादक श्रीपाद अपराजित, जागृत भारत न्यूज पोर्टलचे संपादक प्रा. डॉ ज्ञानेश हटवार, डॉ धनंजय गभणे , सौ वर्षा मेश्राम डॉ अशोक खोब्रागडे, सौ. रंजना दाते, डॉ जयश्री सातोकर, रहीम खान आदी मान्यवर उपस्थित होते.
या परिसंवादात मान्यवरांनी सार्वजनिक ग्रंथालय चालविणाऱ्या व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडून त्या शासनाने त्वरित सोडवण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. सार्वजनिक ग्रंथालय हे समाजाला व व्यक्तीला योग्य मार्गदर्शन करत असुन व्यक्तीमत्व विकास करतात. वाचन संस्कृती सर्वसामान्यात रूजविण्याचे महान कार्य करतात. अशा ग्रंथपालांना समान काम समान वेतन या तत्त्वावर सेवाशर्ती, वेतनश्रेणी व नियम लागू करावे व मरणासन्न अवस्थेत असलेल्या ग्रंथालयांना ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करावेत. सार्वजनिक ग्रंथालयांना शासकीय भूखंड प्रदान करून वाचनालय बांधून द्यावेत, त्यांना संगणक देवून सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ करावी, असे या चर्चासत्रात मान्यवरांनी सांगितले.
महाराष्ट्र ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ गजानन कोठेवार व भाऊराव पत्रे यांची मुलाखत प्रा. नरेश आंबिलकर यांनी घेतली. संमेलनात विदर्भ सार्वजनिक ग्रंथालय परिषदेच्या वतीने विविध मागण्यांचे ठराव मंजूर करण्यात आले. या मागण्या शासन स्तरावर पूर्ण करण्यासाठी ठरावाची प्रत डॉ गजानन कोठेवार यांना देण्यात आली. याप्रसंगी ग्रंथालय चळवळीसाठी उत्कृष्ट योगदान देणाऱ्या ग्रंथालय कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नरेश अंबिलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन राजकुमार हटवार यांनी मानले. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मुस्लिम लायब्ररीचे सचिव सय्यद सोहेल, इरफान खान, विदर्भ सार्वजनिक ग्रंथालय परिषदेचे रमेश गोमासे, अशोक हूमने, महेंद्र जुमळे, रणजीत सेलोकर, पवन पडोळे, सौ कुसुमताई कांबळे, भावनाताई बागडे, सौ प्रज्ञा गेडाम, राजश्रीताई मासुरकर, विनोद बावनकर, घनश्याम कानतोडे, सुधीर खोब्रागडे, महेश साखरवाडे, भागवत शिवनकर, दिनेश हरडे, युवराज साठवणे यांनी हे ग्रंथालय संमेलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".