मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांचे तात्काळ शासन आदेश काढण्याचे दिले आश्वासन .!
चंद्रपुर (वि.प्र.) : यावर्षी जून ते आत्तापर्यंत झालेली अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील पिकेही वाहून गेली तर काही ठिकाणी जमीन खरवडून निघाली. येवढे मोठे नुकसान झाल्यानंतरही शासनाकडून अतिवृष्टीची मदत देण्यात येणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला नव्हता. परिणामी अतिवृष्टीच्या मदतीपासून जिल्ह्यातील शेतकरी वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती.
यासंदर्भात शेतकऱ्यांनी राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांना हाक दिली. त्यांनीही शेतकऱ्यांच्या हाकेला ओ देत लगेच दखल घेऊन हालचाली केल्या. आमदार मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची सविस्तर माहिती घेतली यादरम्यान अतिवृष्टीच्या दिल्या जाणाऱ्या मदतीच्या यादीमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश नसल्याचेही त्यांना कळले. त्यानंतर त्यांनी लगेच हालचाली केल्या.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव डॉ. सोनिया सेठी यांना फोन करून अतिवृष्टीच्या मदतीमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश करण्याची आणि शेतकऱ्यांना मोबदला देण्याची मागणी केली. सोनिया सेठी यांनीही आ.मुनगंटीवार यांच्या मागणीची दखल घेत चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश करून घेण्याचे आणि शक्य तितक्या लवकर अतिवृष्टीची मदत देण्याचे आश्वासन दिले.
यासंदर्भात २३ सप्टेंबर रोजीच चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाला प्रस्ताव पाठवला होता. त्यामध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे १२ कोटी ५३ लक्ष ३७ हजार रूपये नुकसान भरपाईची रक्कम देण्याची मागणी करण्यात आली होती. पण त्याचीही दखल घेतली गेली नव्हती. त्यामुळे आमदार मुनगंटीवार यांना पुढाकार घ्यावा लागला. त्यांच्या पुढाकारामुळे आता चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळणार आहे.
आ.सुधीर मुनगंटीवार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमीच संवेदनशील असतात. यापूर्वी विक्रमी पीकविमा आणि धानाचा बोनस मिळवून दिलेला आहे.याही वेळी धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी चुकाऱ्यासाठी २७ कोटी ५२ लाख रुपये मंजूर करवून घेतलेले आहेत.
