आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल शिक्षणाची वाट – जनसामर्थच्या मोफत शिकवणी व अभ्यासवर्गास उत्साहात प्रारंभ .!
बल्लारपूर (का.प्र.) : “ज्ञानानेच भविष्य उज्ज्वल होते” या विश्वासाने जनसामर्थ सामाजिक बहुउद्देशीय संस्था, बल्लारपूर व निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ, हडपसर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा केमरीठ व केमतुकुम येथील विद्यार्थ्यांसाठी मोफत शिकवणी व अभ्यासवर्ग कार्यक्रमास दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी उत्साहात प्रारंभ झाला.
इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः सुरू झालेला हा उपक्रम एप्रिल २०२६ पर्यंत नियमित चालणार असून, ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गोडी लागावी हा यामागचा मुख्य हेतू आहे. समाजमंदिर जवळ सुरू झालेल्या या वर्गामुळे अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य वातावरण आणि मार्गदर्शन मिळणार आहे.
या उपक्रमाचे यशस्वी आयोजन संस्थेचे अध्यक्ष अश्विनी धनश्याम कोल्हेकर, सचिव पंकज परशुराम गणवीर तसेच निरंकार शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ऍड.श्री. केशव धेंडे , सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. स्थानिक ग्रामस्थ, पालक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, या वर्गामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून उज्ज्वल भविष्याचा मार्ग मोकळा होईल असा विश्वास व्यक्त केला.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.नरेश उईके (सदस्य ग्रा.प.) विठल कुळमेथे(वन समिती अध्यक्ष) सोयाम ताई(पोलिस पाटील)कविता गेडाम(स.शिक्षिका), एम. टी.साव व जी.के उपरे सामाजिक कार्यकर्ते,स्वाती अत्राम उपस्थित होते.
“शिक्षण हीच खरी शक्ती आहे, आणि हाच बदलाचा मार्ग आहे,” या विचाराने प्रेरित हा उपक्रम समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे पाऊल ठरेल, असा जनसामर्थचा विश्वास आहे.
