मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुलाचा लोकार्पण सोहळा..!

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे - कळवा - साकेत हा तिसरा खाडी पूल तसेच मुंब्रा वाय जंक्शन या पुलाचा लोकार्पण सोहळा..!
ठाणे (जगदीश काशिकर) - ठाणे शहरातील कळवा आणि मुंब्रा या शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या ठाणे - कळवा - साकेत हा तिसरा खाडी पूल तसेच मुंब्रा वाय जंक्शन या पुलाचा लोकार्पण सोहळा आज मा. मुख्यमत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज मोठ्या उत्साहात पार पडला. 
ठाणे आणि कळवा दरम्यान तिसऱ्या खाडी पुलाचे विटावा ते ठाणे पोलीस मुख्यालयादरम्यान तयार झालेल्या पहिल्या मार्गिकेचे लोकार्पणही आज करण्यात आले. त्यासोबत मुंब्रा येथून शीळफाट्याकडे जाणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या वाय जंक्शन पूलदेखील नागरिकांच्या सेवेत दाखल झाला आहे. या पुलाची दुसरी मार्गिका १ डिसेंबर २०२२ पर्यंत खुली होणार असल्याचे यासमयी मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना जाहीर केले. 
ठाणे शहराला वाहतूक कोंडीतून सोडवण्यासाठी अनेक प्रकल्प सध्या प्रगतीपथावर असून भविष्यात ठाण्यापर्यंत फ्रीवे, फाउंटन जंक्शन पर्यंत कोस्टल रोड आणि वाहतूक कोंडीमुक्त चौक असे अनेक विकास प्रकल्प प्रगतीपथावर असून त्यामुळे भविष्यात शहराची वाहतूक कोंडीतून नक्की मुक्तता होईल अशी ग्वाही मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना दिली. 
याप्रसंगी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड, आमदार रवींद्र फाटक, एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते तसेच ठामपा माजी महापौर नरेश म्हस्के, माजी उपमहापौर सौ.पल्लवी कदम, विभागप्रमुख पवन कदम, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, उपविभागप्रमुख स्वानंद पवार आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".